बेळगाव : भारतीय अध्यात्मिक परंपरा जगाला प्रेरणादायी आहे. आपला देश धार्मिक क्षेत्रात अग्रेसर आहे. मात्र आधुनिक युगात धर्मशास्त्र आणि परंपरेचा र्हास होत चालला आहे. याच कडे लक्ष देऊन धर्मशास्त्र परंपरेला पुढे नेण्यासाठी मल्याळ येथे श्रीहरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल स्थापन करण्यात येत आहे. या कामात प्रत्येकाचे सहकार्य आणि योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बेंगळुरू गोसावी मठाचे पिठाधीश मंजुनाथ भारतीय महास्वामी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.

यावेळी पुढे बोलताना मंजुनाथ भारती महास्वामी म्हणाले, आजच्या काळात भरकटलेल्या तरुण पिढीला जीवनाची दिशा दाखवण्यासाठी गुरुकुलांची नितांत आवश्यकता आहे. प्राचीन काळात ऋषीमुनींच्या कठोर साधनेतून आपणाला जीवनाचे ज्ञान प्राप्त झाले आहे. ऋषीमुनींच्या तपस्येमुळे ज्ञानाचे भांडार मिळाले आहे. प्रत्येकाच्या जीवनात अध्यात्माला मोठे महत्त्व आहे.मात्र आधुनिक युगात धर्मशास्त्र आणि परंपरा कमी होत चालली आहे. याकडे लक्ष देऊन,बेळगावपासून काही अंतरावर असलेल्या हल्याळ गावात पाच एकर प्रशस्त जागेत श्रीहरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुलाची स्थापना करण्यात येत आहे .

या गुरुकुलात भारतीय संस्कृती, धर्मशास्त्र, योग, संगीत कला अशा विविध विषयांचे ज्ञान दिले जाणार आहे. शिक्षणाबरोबरच संस्कार आणि शिस्तीचे धडे दिले जाणार आहेत.श्रीहरी छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुलात पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व समाजातील मुलांना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. या कामात समाजातील दानी व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य मोलाचे आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने गुरुकुलाच्या स्थापनेत आर्थिक सहकार्य करावे. असे आवाहनही मंजुनाथ भारती स्वामी यांनी केले.

यावेळी मराठा समाज सुधारणा मंडळाचे माजी अध्यक्ष गोपाळ बिर्जे,सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड तसेच मराठा मंदिर चे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव उपस्थित होते.