• आमचे पाणी, आमचा हक्क घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

बेळगाव / प्रतिनिधी

“आमचे पाणी हा आमचा हक्क” ही घोषणा देत पर्यावरणवाद्यांसह सामान्य नागरिकांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. म्हादई नदीचे पाणी वळविण्याचा सरकारचा घाट थांबवावा या प्रमुख मागणीसह सर्व नद्या आणि भीमागड जंगलाचे संरक्षण व्हावे कळसा – भांडुरा प्रकल्पाचे काम थांबवावे अशा विविध मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या. विशेष म्हणजे पाणी हक्काच्या मागणीसाठी उद्योजक, शिक्षणतज्ञ प्राध्यापक, व्यावसायिक यांच्यासह ग्रामीण भागातील असंख्य घटक आणि सर्व स्तरातील नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.

या मोर्चा दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि पर्यावरणवादी सुरेश हेब्रीकर म्हणाले की, पश्चिम घाट, म्हादई संरक्षित करणे आवश्यक आहे. पश्चिम घाट केवळ कर्नाटकसाठीच नाही तर संपूर्ण दक्षिण भारतासाठी आवश्यक आहे. पर्यावरण प्रदूषणामुळे हवामान बिघडत आहे, म्हणून जंगलाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. दक्षिण भारतातील ६० टक्के लोक पश्चिम घाटावर अवलंबून आहेत. पश्चिम घाटावर तयार होणाऱ्या ढगांमुळे खूप पाऊस पडतो. त्यामुळे नद्या आणि समुद्रातील पाणीसाठ्यात वाढ होते, याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल. म्हणून सरकारने तिथे प्रकल्प आणू नयेत, त्यामुळे जंगल नष्ट होईल. राजकारणी सत्ता आणि पैशाच्या हव्यासापोटी संवेदनशील मुद्द्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पश्चिम घाटाच्या पर्यावरणाच्या अस्तित्वासाठी लढा आवश्यक आहे आणि सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.

तर मोर्चा सहभागी झालेल्या उत्तराखंडमधील आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी राधीमा पांडे म्हणाल्या, “जर पर्यावरण संवर्धन केले तरचं आपण जगू शकतो. या संदर्भात, सर्व स्तरातील लोकांनी पर्यावरण संघर्षाला पाठिंबा दिला पाहिजे. मी सोशल मीडियाद्वारे याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करेन.”

यावेळी पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कामत म्हणाले की, जर म्हादई नदी जीवंत राहिली तर मलप्रभा नदी टिकून राहू शकते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की गेल्या ४० वर्षांत मलप्रभा नदीवरील धरण फक्त चारवेळा भरले आहे. जंगलाचा नाश हे याचे कारण आहे. या संदर्भात, म्हादई आणि भीमा जंगलांचे संरक्षण आवश्यक आहे, असे ते म्हणाले. निषेध मोर्चात सहभागी झालेले हंडी भगडनाथ स्वामीजी म्हणाले की, जर पर्यावरण असेल तर आपण जगू शकतो. भीमागौडा जंगलात एक वातावरण आहे, जे वन्यजीवांचे संजीवनी आहे आणि तेथे काम करणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी आंदोलकांशी संवाद साधताना आमदार आसिफ सेठ यांनी आश्वासन दिले की, या मागण्या सरकारच्या निदर्शनास आणून दिल्या जातील आणि योग्य निर्णय घेतला जाईल. यावेळी आंदोलकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद उपस्थितीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

या मोर्चात चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, आंदोलकांचे नेतृत्व करणारे कॅप्टन नितीन धोंड यांच्यासह दिलीप कामत, नीलिमा कामत, कर्नल सैनी, पर्यावरण प्रेमी शिवाजी कागणीकर, प्राचार्य श्रीकृष्ण प्रभू, रमाकांत कोंडुसकर, रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे, सरिता पाटील, सुहास किल्लेकर, चंद्रकांत गुंडकल, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी, राजेंद्र मुतगेकर, लता कित्तूर, संजय पोतदार, नगरसेवक रवी साळुंखे, सुजित मुळगुंद, राजू टोपण्णावर, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि पर्यावरणवादी सुरेश हेब्रीकर, सुजित मुळगुंद यांच्यासह खानापूर आणि बेळगावच्या आसपासच्या भागातील शेकडो तरुण, महिला आणि ग्रामस्थांचा समावेश होता.