- प. महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा निर्णय
- पारंपारिक पद्धतीचे कपडे परिधान करूनच मंदिरात प्रवेश
- तोकड्या कपड्यात प्रवेश नाही
कोल्हापूर / प्रतिनिधी
करवीर निवासीनी अंबाबाई व वाडी रत्नागिरी वरील जोतिबाच्या दर्शनासाठी भाविकांना आता तोकडे कपडे परिधान करून मंदिरात जाता येणार नाही. धार्मिकता व पावित्र्य जपण्याच्या उद्देशाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने अंबाबाई व जोतिबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेसकोड लागू केला आहे. मंगळवार, १३ मे पासून याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे भाविकांनी आता अंबाबाई व जोतिबाच्या दर्शनाला पूर्ण कपडे घालूनच मंदिरात यावे, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे. गेल्या सात वर्षात तिसऱ्यांदा भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे.
देवस्थान समितीचे तत्कालीन अध्यक्ष महेश जाधव यांनी २०१७ – १८ साली सर्वात प्रथम अंबाबाई व जोतिबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड लागू केला होता. त्याचे काही महिनेच अंमलबजावणी सुरू राहिली. परंतु कालांतराने ड्रेस कोड विस्मृतीत गेला. यानंतर देवस्थान समितीने पुन्हा २०२२ साली ड्रेस कोड लागू केला. परंतु त्याचीही प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. गेल्या काही महिन्यांपासून महिला व पुरुष भाविक तोकडे कपडे परिधान करून अंबाबाई व जोतिबाच्या दर्शनाला येत असल्याचे निदर्शनास येत होते. मंदिरात भाविक तोकड्या कपड्यानिशी येतात. भाविकांना ड्रेस कोड करावा अशी मागणी काही भाविकांनी महाराष्ट्र मंदिर महासंघाकडे केली होती. काही दिवसांपूर्वी महासंघाच्या शिष्टमंडळाने तातडीने देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांची भेट घेऊन भाविकांसाठी वस्त्र संहिता लागू करावी या मागणीचे निवेदन दिले होते. देवस्थान समितीचे प्रशासक अमोल येडगे यांच्याशी चर्चा करून अंबाबाई मंदिर व जोतिबा मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे देवस्थान समितीने निवेदन प्रसिद्ध दिले.
- मंदिरांमध्ये असे कपडे चालणार नाहीत
- बरमुडा, बनियन
- स्लिव्हलेस ब्लाऊज अथवा टी-शर्ट
- शॉर्ट स्कर्ट, थ्री फोर्थ
- अंग प्रदर्शन करणारे कोणत्याही प्रकारचे अन्य कपडे