बेंगळूर / प्रतिनिधी
राज्य पोलीस महासंचालकपदावर प्रभारी म्हणून सीआयडीचे डीजीपी डॉ. एम. ए. सलीम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अलोक मोहन यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या या पदाचा कार्यभार डॉ. सलीम यांनी बुधवारी सायंकाळी हाती घेतला.
काही दिवसांसाठी प्रभारी पोलीस महासंचालक म्हणून सध्या डॉ. एम. ए. सलीम यांची नेमणूक करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संमतीनंतर त्यांची कायमस्वरुपी नेमणूक करण्यास राज्य सरकार विचाराधीन आहे.
सेवाज्येष्ठतेच्या आधारावर अग्निशमन आणि आपत्कालिन सेवा विभागाचे डीजीपी प्रशांतकुमार ठाकूर, सीआयडीचे डीजीपी डॉ. सलीम आणि सायबर गुन्हे विभागाचे डीजीपी प्रणव मोहंती यांच्यासह 7 वरिष्ठ आयपीएस अधिकारी राज्य पोलीस महासंचालकपदाच्या शर्यतीत होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची विशेष मर्जी असल्याने डॉ. सलीम यांना पुढील तीन महिन्यापर्यंत राज्य पोलीस महासंचालक पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. युपीएससीकडून संमती मिळाल्यानंतर ते कायमस्वरुपी पोलीस महासंचालक बनतील, असे सूत्रांकडून समजते.
डॉ. एम. ए. सलीम यांचा जन्म 25 जून 1966 रोजी बेंगळूरच्या चिक्कबाणवार येथे झाला. त्यांनी वाणिज्यशास्त्रातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. 1993 मध्ये उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी पोलीस व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी मिळविली. 2010 मध्ये बेंगळूर विद्यापीठातून वाहतूक व्यवस्थापन विषयात डॉक्टरेट मिळविली. डॉ. एम. ए. सलीम हे 1993 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी कलबुर्गी, कुशालनगर उपविभाग आणि सागर उपविभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उडुपी, हासन जिल्हा पोलीसप्रमुख, राज्य वक्फ बोर्डाचे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. म्हैसूर पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे.