• पावसाळ्याच्या तयारीसाठी महापालिकेत संयुक्त बैठक

बेळगाव / प्रतिनिधी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिका, वन विभाग, हेस्कॉम आणि झाडे तोडणारे कंत्राटदार यांच्यात महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक प्रतिबंधात्मक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महापौर मंगेश पवार यांनी अधिकाऱ्यांना धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांचे सर्वेक्षण करून, कोणतीही हानी होण्यापूर्वीच तातडीने उपाययोजना करण्याची सूचना केली.

पावसाळा सुरू झाला असून, बेळगाव महानगरपालिकेने शहरात आवश्यक ती खबरदारीची पावले उचलली आहेत. संबंधित नगरसेवकांच्या उपस्थितीत वीजेच्या तारांना स्पर्श करणारी आणि धोकादायक असलेली झाडे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यात एबीसी श्रेणी तयार करून, कोणतीही हानी होण्यापूर्वीच जलद गतीने कारवाई करावी, असे महापौरांनी सूचित केले.

याबाबत माहिती देताना महानगरपालिकेच्या आयुक्त शुभा बी. म्हणाल्या की, शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे आणि पडण्याच्या स्थितीत असलेली झाडे हटवण्यासाठी सर्वेक्षण करून ती काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, एक हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, १५,००० मीटर लांबीच्या नाल्यांतील गाळ काढण्यात आला आहे. यूजीडी मशीन, नवीन जेटिंग मशीन, सक्शन मशीन आणि यूजीडी वाहनांसह पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच, पावसाळ्यामुळे होणारे नुकसान आणि पशुधनाच्या हानीची नोंद घेण्यासाठी एक पथकही तयार करण्यात आले आहे.

कोविडच्या संदर्भातही पूर्ण खबरदारी घेण्यात आली असून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कामही केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीला महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी, नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, विभागीय वन संरक्षक पुरुषोत्तम, उपविभागीय वन अधिकारी विनय गौडर, हेस्कॉमचे सहायक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे यांच्यासह महानगरपालिका आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.