- कोगनोळी टोलनाक्यावरील घटना
- ट्रकसह एका बूथचे लाखोंचे नुकसान
कोगनोळी / वार्ताहर
मालवाहू ट्रकचा टायर फुटल्याने ट्रकला आग लागल्याची घटना पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील कोगनोळी (ता. निपाणी) येथील टोल नाक्यावर बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये टोल बूथचे व ट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की , मालवाहू ट्रक क्रमांक केए ०१ एजे ३९२९ हा बेंगळूरहून मुंबईकडे जात होता. येथील महामार्गावरील टोल नाक्यावर आला असता पुढचा टायर फुटला त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक टोल नाक्यावरील बूथच्या कठड्याला धडकला. त्यामुळे ट्रकची डिझेल टाकी फुटून ट्रकला आग लागली. यामुळे टोल नाक्यावरील नागरिक व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. तातडीने कागल व निपाणी येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. टोल कर्मचारी व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टोल नाक्याचा एक बूथ व ट्रक जळाला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.