• खानापूर तालुक्यातील घटना

खानापूर / प्रतिनिधी

खानापूर तालुक्यातील देमीनकोप गावाजवळील तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाला. तरुण चलवादी (वय २१ वर्ष, रा. कंचनोळी, ता. हल्ल्याळ असे मृत युवकाचे नाव आहे. सदर घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार उद्या सोमवार दि. ७ ते बुधवार दि. ९ एप्रिल पर्यंत कोडचवाड येथील श्री कलमेश्वर देवाच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर यात्रा प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात भरवली जाते. या यात्रेच्या निमित्ताने मृत तरुण आपल्या मावशीच्या घरी आला होता. आज घरातील स्वच्छता करून कपडे धुण्यासाठी तो व त्याच्या कुटुंबातील लोक तलावावर आले होते. त्यावेळी तो तलावात पोहण्यासाठी गेला होता. त्याला चांगले पोहता येत नसल्याने आपल्या कुटुंबाच्या समोरच त्याचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबातील लोकांनी एकच आक्रोश केला. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली व त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर त्याचा शोध लागला. सदर घटनेची नोंद नंदगड पोलीस स्थानकात झाली असून, नंदगड पोलीस स्थानकाचे हवालदार वस्त्रद व पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे.