- खासगी रुग्णालयातील गर्भवती महिलेला संसर्ग
बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून बेळगाव शहरातील एका गर्भवती महिलेला संसर्ग झाला आहे. तेव्हा मुले आणि गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी, अशी सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ईश्वर गडाद यांनी केली.
शनिवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले, सिंगापूरमध्ये कोविडची प्रकरणे समोर आली होती. आता कर्नाटकातही कोरोनाच्या सुमारे ३० प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यातच आता बेळगावमध्येही एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. बेळगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या गर्भवती महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. नागरिकांना याची काळजी आहे यात काही शंका नाही. सर्वांची रोगप्रतिकारक शक्ती आता वाढली आहे. मात्र मधुमेही, लहान मुले आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांनी सुरक्षित राहावे. त्यांनी सौम्य शरीरदुखी आणि तापाकडे दुर्लक्ष करू नये, अशी लक्षणे आढळून आली तर तपासणी आणि उपचारांसाठी ताबडतोब रुग्णालयात जाण्याचे आवाहन केले.
जिल्हा आणि तालुका रुग्णालयांमध्ये आधीच विशेष खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. जनतेने काळजी करू नये. आम्ही आतापर्यंत ८ कोविड चाचण्या केल्या आहेत. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. एका खाजगी रुग्णालयात एक महिला पॉझिटिव्ह आढळली आहे. ते म्हणाले की ती एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
महाराष्ट्रात कोविड संसर्ग वाढत आहे. राज्य सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वेही पाठवली आहेत. आरोग्य विभाग त्यानुसार कारवाई करेल असे त्यांनी सांगितले. हा सिंगापूरचा विषाणू आहे की जुना विषाणू आहे हे अद्याप निश्चित झालेले नाही. कोविड परिस्थिती हाताळण्यासाठी सुमारे तीन हजार डॉक्टर सज्ज आहेत असे सांगताना मुले, गर्भवती महिला आणि वृद्धांनी मास्क परिधान करावेत असे आवाहन त्यांनी केले.