• बेळगाव अल्पसंख्याक काँग्रेसची मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव / प्रतिनिधी

पाकिस्तान विरुद्धच्या ऑपरेशन सिंधुरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या बेळगावच्या स्नुषा कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावलेले मध्यप्रदेशचे भाजप मंत्री कुमार विजय शाह यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी बेळगाव अल्पसंख्याक काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी मोहम्मद रोशन यांना सादर करण्यात आले.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांना गोळ्या घालून त्यांची हत्या केलेल्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंधुरमधून भारतीय सैन्याने योग्य धडा शिकवला आहे. तेव्हा ऑपरेशन सिंधुरचे नेतृत्त्व करणाऱ्यांपैकी एक कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्ध मध्यप्रदेशचे भाजप मंत्री कुंवर विजय शाह यांनी केलेल्या विधानाचा आम्ही निषेध करतो. मध्य प्रदेशातील भाजप सरकारने अपमानास्पद विधान करणाऱ्या भाजप मंत्र्यावर कारवाई करावी आणि त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे आणि आमदार पदावरून बडतर्फ करावे. तसेच, संतीबस्तवाड येथील धर्म ग्रंथ जाळल्याप्रकरणी लवकरच न्याय मिळावा अशी मागणी अल्पसंख्याक काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुलगफार घीवाले यांनी केली.

यावेळी अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मन्सूरअली अत्तार, सलीम खतीब, मैनुद्दीन मकानदार, बाबुलाल भगवान, अल्लाबक्ष इनामदार आदी उपस्थित होते.