बेळगाव / प्रतिनिधी
दिवंगत माजी केंद्रीय मंत्री, बी. शंकरानंद यांनी चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून सात वेळा प्रतिनिधित्व केले आणि तरुण वयात खासदार म्हणून त्याच मतदार संघात निवडून येणे हे माझे भाग्य आहे, असे मत खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
आज माजी केंद्रीय मंत्री, दिवंगत बी. शंकरानंद यांच्या जन्मशताब्दी समारंभाचा भाग म्हणून शहरातील क्लब रोडचे नामकरण आणि पुतळ्याचा पायाभरणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बी. शंकरानंद यांचे सुपुत्र प्रदीप कणगळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात बेळगावचे महापौर मंगेश पवार, चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी, उपमहापौर वाणी जोशी, उत्तर आमदार आसिफ सेठ, दक्षिण आमदार अभय पाटील, माजी खासदार रमेश कत्ती, माजी आमदार फिरोज सेठ, माजी महापौर सविता कांबळे, नगरसेवक संदीप जिरग्याळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत क्लब रोडचे बी. शंकरानंद असे नामकरण करून नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर बी. शंकरानंद यांचा पुतळा उभारणीसाठी कोनशिला समारंभ पार पडला.
यावेळी खासदार प्रियांका जारकीहोळी पुढे म्हणाल्या, दिवंगत बी. शंकरानंद यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांची ओळख आजही बेळगावच्या खेड्यांपासून दिल्लीपर्यंत ताजी आहे. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ अजूनही दिल्लीत त्यांच्या नावाने ओळखला जातो, असे त्यांनी सांगितले.
माजी राज्यसभा सदस्य आणि केएलईचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले की, माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यात झाला आणि ते एक अभिमानी सुपुत्र होते ज्यांनी बेळगावची कीर्ती देशभर पोहोचवली. बी. शंकरानंद यांचे व्यक्तिमत्व साधे आणि सज्जन होते. त्यांनी कधीही पदाचा गैरवापर केला नाही. त्यांनी अनेक प्रकल्प बेळगावसाठी आणले आणि बेळगावसह देशाला प्रगतीपथावर नेले.
आमदार अभय पाटील म्हणाले की, बी. शंकरानंद मुख्यमंत्री झाले नाहीत. मात्र त्यांनी अनेकांना मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. त्यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, आम्ही आमच्या पक्षभेद विसरून रस्त्याचे नाव बदलण्यासाठी आणि पुतळा उभारण्यासाठी सहकार्य केले.त्यांच्या सक्रिय राजकारणाची ओळख दिल्ली पर्यंत पोहोचली आहे. त्यांचे उपकार आजही अनेकांवर आहेत. त्यांचे साधे आणि सज्जन व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी आदर्श आहे.
माजी खासदार रमेश कत्ती म्हणाले की, बी. शंकरानंद यांनीच देशाला बेळगाव जिल्हा दाखवला. त्यांनी ३५ वर्षांच्या सत्ताकाळात मूल्यांवर आधारित राजकारण केले. त्यांनी सर्व धर्मांच्या लोकांना उभे केले. म्हणून, जनतेला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी राजकारणात यावे असे वाटते. त्यामुळे जनतेनेच त्यांचा मुलगा प्रदीप कणगळी यांना ती इच्छा पूर्ण करण्याचे सुचवले.