• गणेशपुर येथील घटनेमुळे परिसरात खळबळ

बेळगाव / प्रतिनिधी

लक्ष्मीनगर गणेशपुर परिसरात एका महिलेचा अपार्टमेंटमध्ये घुसून, तिचे मंगळसूत्र हिसकावून गळा दाबून खून करण्यात आला. सोमवार दि. २१ एप्रिल रोजी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अंजना अजित दड्डीकर (वय ४९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, अंजना आणि त्यांचे पती अजित दड्डीकर हे दोघे अपार्टमेंट मध्ये राहत होते. अजित हे ऑटो रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होते. सोमवारी सायंकाळी ते घरी परतल्यानंतर त्यांना पत्नी बेशुद्धावस्थेत आढळली. त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या अंजनाला तातडीने बेळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला.

तिच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातले आणि सोन्याची अंगठी चोरून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.