बैलहोंगल / वार्ताहर
बेळगाव जिल्ह्याच्या बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी गावाच्या हद्दीत दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. बैलहोंगल पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. दरम्यान मृतांची ओळख पटली असून अनिस मुस्ताक सय्यद (वय ३०), त्यांची पत्नी आयमान अनिस सय्यद (वय २४) आणि त्यांचा मुलगा अहमद अनिस सय्यद (१.५) तिघेही (रा. हिरेबागेवाडी) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात अनिसची मेहुणी आयशा अन्वर सय्यद ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी बेळगावातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, अनिस सय्यद कारमधून आपल्या कुटुंबासह गोकाकहून हिरेबागेवाडीकडे जात होते. यावेळी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना पाठीमागून येणाऱ्या कारने अनिस यांच्या कारला धडक दिली. सदर कार सौंदत्ती परसागडा मतदारसंघाचे माजी आमदार आर. टी. पाटील यांची आहे. या कारमधून प्रवास करणारा माजी आमदाराचा मुलगा आणि अन्य एकजण जखमी झाले असून त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.
या घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी आणि बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच स्थानिकांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी पोलीसांचा अधिक तपास सुरू आहे.