- सीमाभागातील शेतकऱ्यांना दिलासा
- चिंचणे जंगलात विसावला
बेळगाव / प्रतिनिधी
गत ३६ दिवसांपासून बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेवर मुक्तपणे संचार करुन दहशत माजविणारा चाळोबा गणेश हत्ती सोमवारी (दि. २६) पहाटे महाराष्ट्रात परतला. तो परतीच्या मार्गावर असून सोमवारी पहाटे ६.३० वाजता उचगाव ते नेसरी या मार्गावरील तेऊरवाडीच्या (ता. चंदगड) वेशीत त्याने ग्रामस्थांना दर्शन दिले. यानंतर तो कमलवाडीतून थेट हुक्केरी व चंदगड तालुक्याच्या सीमेवरील चिंचणे जंगलात गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. चाळोबा गणेश हत्ती २० एप्रिलच्या पहाटे चिंचणे जंगलातून किटवाड धरण व अतिवाडमार्गे थेट बेळगाव तालुक्याच्या सीमेवरील महिपाळगड जंगलात वास्तव्य करत होता. रोज सायंकाळ होताच तो बेकिनकेरे, अतिवाड या गावच्या शिवारातून धुडगूस घालत होता. लोकवस्तीत येऊन त्याने हल्ले केले आहेत. प्रथम हॉटेल, रसवंतीगृह तसेच पार्क केलेल्या कारची तोडफोड करून शिवारात ठेवलेली ट्रॉली उलथवून लाखो रुपयांचे नुकसान केले होते.
आता हा हत्ती परतीच्या मार्गावर असून तो सध्या हुक्केरी तालुक्याच्या सीमेजवळील चिंचणे जंगलात विसावल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तेऊरवाडीत सोमवारी सकाळी हत्ती दाखल झाल्याने वनखात्याचे पथकही दाखल झाले होते. हत्तीने बेळगाव तालुक्याच्या सीमेवरुन बुकिहाळ खुर्द, बुकिहाळ बुद्रुक, नागरदळे, किणी शिवारमार्गे कोवाडमधील ताम्रपर्णी नदी ओलांडून तेऊरवाडी हे गाव गाठले. यानंतर तो चिंचणे येथील जंगलात गेल्याचे सांगण्यात येत आहे.
- मूळ जंगलात पाठविण्याचे प्रयत्न
गतवर्षीही हा हत्ती महिनाभर बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमाभागात वास्तव्य करून लाखो रुपयांचे नुकसान केले होते. यंदा सलग दुसऱ्या वर्षीही या हत्तीकडून नुकसान झाले आहे. सदर हत्ती हा आजरा येथील चाळोबा जंगलातून आला असून, त्या मूळ जंगलात तो जावा यासाठी वन खात्याकडूनही प्रयत्न सुरु आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यासाठी हालचाली गतिमान कराव्यात, अशी मागणी आता शेतकऱ्यांतून होत आहे.