• भर दिवसा लोकवस्तीत धुमाकूळ : वनखात्याच्या दुर्लक्षामुळे संताप

बेळगाव / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा वनक्षेत्रातील आजरा येथील चाळोबा जंगलातून २० एप्रिलला बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमाभागात आलेल्या चाळोबा गणेश हत्तीने गत सोळा दिवसांपासून धुमाकूळ घातला असून, रविवारी (दि. ४) सायंकाळी ६ वा. अतिवाड फाटा येथील एका हॉटेलवर हल्ला केला. हत्तीने हॉटेलच्या मागील खोलीत ठेवलेले डी फ्रीज सोंडीने बाहेर ओढून फोडून टाकले. तसेच शेजारी असलेली पाण्याची प्लास्टिक टाकीही फोडली. हॉटेलचालक संजय गावडे यांना या घटनेमध्ये ५० हजार रुपये फटका बसला. वर्षभरानंतर चाळोबा गणेश हत्ती पुन्हा बेळगाव तालुक्याच्या सीमाभागात आला असून, तो आता दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहे. काही दिवसांपूर्वी हत्ती केवळ रात्री जंगलाबाहेर पडून नुकसान करत होता. मात्र, आता तो दिवसाही बाहेर पडू लागल्याने शेतकरी धास्तावले आहेत. त्यामुळे वनखात्याने या परिसरात चोवीस तास गस्त ठेवावी, अशी मागणी होत आहे.

उचगाव कोवाड या रस्त्यावर अतिवाड फाटा येथे तीन हॉटेल्स आहेत. यापैकी मध्यभागी असलेल्या लोटस हॉटेलच्या मागील बाजूच्या खोलीत डी फ्रीज ठेवले होते. सदर फ्रीज हत्तीने सोंडीने बाहेर ओढून फोडून टाकले. तसेच शेजारी असलेली पाण्याची टाकीही फोडून १०० मीटरवर नेऊन टाकीचा चेंदामेंदा करून टाकला. यावेळी मालक संजय गावडे व दोन कामगार काम करत होते. काही वेळानंतर त्यांना हत्ती आल्याचे समजले. त्यानंतर त्या हत्तीला हुसकावून लावले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

आठ दिवसांपूर्वी दर्शन पाटील यांच्या शेतातील घराचे प्रवेशद्वार मोडून कंपाऊंडमध्ये प्रवेश करून या हत्तीने नुकसान केले आहे. तसेच संदीप भोगण यांच्या घराजवळील दुचाकीचेही नुकसान केले आहे.चाळोबा गणेश हत्तीने गत पंधरा दिवसांपासून बेकिनकेरे व अतिवाड फाट्याजवळील शिवारात धुमाकूळ घातला आहे. सदर हत्ती भर दिवसा लोकवसतीमध्ये येत असल्याने जीवाला धोका निर्माण झाला आहे. वनखात्याने त्वरित या हत्तीचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुनील गावडे यांनी दिला.