- दहावीत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याची शक्कल
बेळगाव / प्रतिनिधी
परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी डिजिटल हेडफोन, एखाद्या उत्तराचे झेरॉक्स, डिजिटल वॉच अशा विविध क्लृप्त्या परीक्षार्थी करीत असतात. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी थेट उत्तरपत्रिका तपासणाऱ्या मूल्यमापकाला पास करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्याचबरोबर ५०० रुपयांची नोट उत्तरपत्रिकेला जोडण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. सध्या दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात उत्तरपत्रिका तपासणी करताना ५०० रुपयांची नोट आढळून आली. त्यावर कन्नडमध्ये परीक्षार्थीने मजकूर देखील लिहिला आहे. ‘तुम्ही मला पास केला तर तुमचे माझ्यावर प्रेम आहे हे सिद्ध होईल, माझ्यावर प्रेम दाखवायची तुमच्याकडे ही चांगली संधी आहे, ५०० रुपयांचा स्वीकार करून त्याचा चहा-पाणी घ्या’, अशी विनवणी परीक्षार्थीने पेपर तपासणीकाला केली आहे.
बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने समाज- माध्यमांवर हा हस्याचा प्रकार ठरत आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची शक्यता नसते असे विद्यार्थी विविध क्लृप्त्या लढवत असतात. त्यामुळे असे प्रकार करण्याऐवजी विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे, असा सल्ला पेपर तपासणीकांकडून देण्यात आला आहे.