• चलवेनहट्टी येथे लग्नाच्या वरातीतून सामाजिक संदेश

चलवेनहट्टी / मनोहर हुंदरे

हौसेला मोल नाही असे म्हणतात, लग्न ही हौसेची बाब. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या ऐपतीनुसार खर्च करत असतो. त्यातच आलिशान वाहनातून वरात काढण्याचे प्रकार नवीन नाही. मात्र चलवेनहट्टी (ता. बेळगाव) येथील एका शेतकरी कुटुंबातील नवरदेव स्वतःच्या लग्नात चक्क बैलगाड्यावरून वरातीमध्ये दाखल झाला. रमेश चंद्रकांत आलगोंडी असे बैलगाड्यावरून वरात काढत शेतीनिष्ठेची प्रचिती देणाऱ्या नवरदेवाचे नाव आहे.

आधुनिक काळात लग्नाचा मोठा बडेजाव केला जातो. शेतकरी कुटुंबातील मुलापेक्षा एखाद्या सरकारी नोकरीतील मुलगा पती अथवा जावई असावा अशी मुलीसह तिच्या आई – वडिलांची इच्छा असते. त्या पद्धतीने सोयरीक जुळवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि अपेक्षेप्रमाणे सोयरीक जुळली अगदी थाटामाटात लेकीचे लग्न करून देतात.

अनेक ठिकाणी शाही थाटात विवाह सोहळा पार पाडून श्रीमंतीचे प्रदर्शन केले जाते. त्यामध्ये नवरदेवाची आलिशान गाडी रथ किंवा घोड्यावरून लग्न मंडपात एन्ट्री ही फॅशनच बनली आहे. पण चलवेनहट्टी येथील नवरदेवाने बैलगाड्यावरून वरातीमध्ये दाखल होत शेतकरी मुलगा नवरा म्हणून नाकारू नका असा सामाजिक संदेश दिला आणि हे पाहून उपस्थित पाहुणे मंडळी देखील भारावून गेली.

ना डॉल्बी…ना धांगडधिंगा… कोणताही प्रकारचा गाजावाजा न करता विवाह सोहळ्याचा आनंद द्विगुणीत करता येतो, हे दाखवून देत बैलगाड्यावरून प्रवास करताना नवरदेवाने शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्याचे उत्तम उदाहरण दिले. सध्या या लग्नाची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.