कोल्हापूर : जोतिबा चैत्र यात्रेचा मुख्य दिवस १२ एप्रिल रोजी असून जोतिबाचे मंदिर सलग ७९ तास भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.११) रोजी पहाटे मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर ते सोमवारी रात्री ११ वाजता बंद होणार आहेत.
शनिवारी (दि.१२) जोतिबा चैत्र यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी पहाटे ५ वाजता महाभिषेक होणार आहे. दुपारी १२ वाजता सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होईल. सायंकाळी ५.३५ मिनिटांनी हस्त नक्षत्रावर श्री जोतिबा देवाचा पालखी सोहळा श्री यमाई मंदिराकडे प्रस्थान करणार आहे.

  • बेळगावच्या सासनकाठीचे आज आगमन :

बेळगावची सासनकाठी १२७ किलोमीटर अंतर चालत जोतिबा मंदिरात मंगळवारी दाखल होईल. पाच दिवस जोतिबा डोंगरावर यांचे वास्तव्य असणार आहे. या सासनकाठी सोबत बैलगाड्यांमधून असंख्य भाविक चालत चैत्र यात्रेसाठी येतात.

  • क्यूआर कोडद्वारे भाविकांना सुविधांची माहिती मिळणार :

पश्चिम देवस्थान व्यवस्थापन समितीने जोतिबा चैत्र यात्रेसाठी येणार्‍या भाविकांसाठी मूलभूत सोयी – सुविधांची माहिती देण्यासाठी क्यूआर कोडची सोय उपलब्ध करून देणार असून वेळेत यात्रा पार पाडण्यासाठी काटेकोरपणे वेळेचे नियोजन केल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

  • मानाच्या १०८ सासनकाठ्या :

सातारा जिल्ह्यातील पाडळीच्या सासनकाठीला यात्रेत पहिला मान आहे. त्यानंतर मानाच्या पहिल्या पाचमध्ये पाटण तालुक्यातील मौजे विहे, कसबा डिग्रजच्या हिम्मतबहाद्दूर चव्हाण, करवीर तालुक्यातील हिम्मतबहाद्दूर निगवे, उधाजीराव चव्हाण, कसबा सांगाव येथील किवळकर यांच्या सासनकाठ्यांचा समावेश आहे.१०८ काठ्या मानाच्या असून त्यांना देवस्थान समितीच्या वतीने क्रमानुसार मानपान दिला जातो. अनेक वर्षांपासून यात्रेआधी एकादशीदिवशी कोल्हापुरात येणारी बेळगावची सासनकाठी सोमवारी पंचगंगातीरी पोहोचली. सासनकाठीचे स्वागत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केले. पंचगंगा घाटावर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सोमवारी मुक्काम करून मंगळवारी ही सासनकाठी जोतिबा डोंगराकडे मार्गस्थ होणार आहे.