- युट्यूब चॅनेलवर भारतात बंदी
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दि. २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचा जीव गेला. या दहशतवादी हल्ल्यावरुन भारतीय सैन्याबाबत गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी याच्यावर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. केंद्र सरकारने शाहीद आफ्रिदी याच्या युट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घातली आहे. आफ्रिदी याने काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांचे समर्थन करत भारतीय सैन्यावर आरोप केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने ही कारवाई करत आफ्रिदीची आर्थिक कोंडी केली आहे.
- शाहिद आफ्रिदी काय म्हणाला होता?
भारताने या हल्ल्यानंतर कोणत्याही पुराव्याशिवाय पाकिस्तानवर आरोप केला. असे व्हायला नको. अशाने एकमेकांमधील संबंध बिघडतात. जिथे हल्ला झाला तिथे भारताचे ८ लाख सैनिक होते. मग कोणताही सैनिक त्यांना वाचवण्यासाठी का आला नाही? हे स्वत:च आपल्या माणसांना मारतात, असे संतापजनक आणि चीड आणणारे वक्तव्य आफ्रिदीने केले होते . त्यानंतर आफ्रिदीची नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरुन चांगलीच कानउघडणी केली होती.