व्हॅटिकन सिटी : कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. सोमवार दि. २१ एप्रिल रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजून ३५ वा. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पोप फ्रान्सिस यांनी २०१३ मध्ये पोप पदाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच इतिहासातील ते पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते.

गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. १४ फेब्रुवारी रोजी त्यांना रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर न्यूमोनिया आणि अशक्तपणाचा उपचार सुरू होता. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना पाच आठवडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, कॅथोलिक चर्चचे मुख्यालय असलेल्या व्हॅटिकनने म्हटले होते की, पोप यांच्या रक्त तपासणी अहवालात मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणे दिसून आली. तथापि, त्यांना १४ मार्च रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता.