- चलवेनहट्टी येथील घटना ; शेतकऱ्याचे जवळपास दोन लाखांचे नुकसान
बेळगाव : गवत गंजीला लागलेल्या आगीत होरपळून एक बैल एक म्हैस मृत्युमुखी पडली. चलवेनहट्टी (ता. बेळगाव) येथे शनिवार (दि. २२) मार्च रोजी ही घटना घडली. भावकू निंगाप्पा हुंदरे असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, चलवेनहट्टी येथील शेतकरी भावकू हुंदरे यांनी आपली जनावरे शेतातील झोपडीत बांधली होती. दुपारी ३ वा. सुमारास या झोपडीनजीक असलेल्या गवत गंजीला अचानक आग लागली. दुपारची वेळ असल्याने आग लागली तेव्हा घटनास्थळी कोणीच नव्हते, त्यामुळे झोपडीत बांधलेली जनावरे या आगीत होरपळली आणि त्यातच एक बैल एक म्हशीचा अंत झाला. याशिवाय ज्वारीची दोन पोतीही जळून खाक झाली.
या घटनेत शेतकऱ्याचे जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले असून त्याच्यावर मोठे संकट कोसळले आहे. दरम्यान रात्री उशिरा पंचनामा करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र जाणीवपूर्वक कोणीतरी ही आग लावल्याची शंका निर्माण झाली आहे.