विजयपूर / वार्ताहर
रस्ता ओलांडताना एका ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील बीएसएफ जवानाचा जागीच मृत्यू झाला. विजयपूर जिल्ह्याच्या निडगुंदी शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर ही घटना घडली. मौनेश राठोड (वय ३५ , रा. कलगी, ता. मुद्देबिहाळ, जि. विजयपूर) असे मृत बीएसएफ जवानाचे नाव आहे. सदर अपघातात ट्रकची दुचाकीला धडक बसली. यावेळी दुचाकीला फरफटत नेणाऱ्या या ट्रकने समोरून येणाऱ्या रुग्णवाहिकेलाही धडक दिली. दरम्यान केरळ येथील रुग्णवाहिका चालक रितेशची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रक आणि रुग्णवाहिका वेगळी केली आणि चालक रितेशला बाहेर काढले. जखमी रितेशला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर वाहतूक कोंडी झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त ट्रक, रुग्णवाहिका आणि दुचाकी बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरू केली. या घटनेची नोंद निडगुंदी पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.