• नदीपात्रात 26.525 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग ; तहसीलदारांनी दिली भेट

विजयपूर / दिपक शिंत्रे

महाराष्ट्रातील निरा खोरे व भीमा खोऱ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे निरा जलाशयातून 26.525 हजार क्यूसेक पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे अशी माहिती चडचण तहसीलदार संजय इंगळे यांनी दिली. त्यांनी धुळखेड गावातील बॅरेजला भेट देऊन नदी पात्रातील पाण्याची पातळी तपासल्यानंतर ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

विजयपूर जिल्ह्यातील चडचण आणि इंडी तालुक्यांतील विविध गावांना पूराचा धोका संभवतो, त्यामुळे ग्रामस्थांनी सावध राहावे, असेही त्यांनी सांगितले. कर्नाटक – महाराष्ट्र सीमाभागात सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे पाण्याचे प्रमाण कधीही वाढू शकते अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता असून, नदीकाठच्या नागरिकांना याची पूर्वसूचना देण्यात आली आहे. लोकांनी आपली जनावरे, पंपसेट्स व अन्य साधनसामग्री सुरक्षित स्थळी हलवावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

  • रस्ते संपर्क तुटला :

भीमा नदीवर बांधलेले ८ बॅरेजेस पाण्याखाली गेले असून त्यावरून पाणी धोकादायक पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे रस्ते संपर्क पूर्णतः तुटलेला आहे. या पाहणी दरम्यान निरीक्षक पी. जे. कोडहोन्नव ग्रामलेखक विठ्ठल कोळी उपस्थित होते.