-
गोकाक शहरातील घटना
गोकाक / वार्ताहर
भरधाव इनोव्हा कार विद्युत खांबावर धडक बसून भीषण अपघात झाला. बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक शहरातील बसव मंटपाजवळ हा अपघात घडला. या घटनेत मोठ्या प्रमाणात शॉर्टसर्किट झाले, मात्र प्रसंगावधान राखत चालक गाडीतून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. सीसीटीव्हीत हा धक्कादायक अपघात कैद झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, भरधाव असलेली इनोव्हा कार चालकाचा ताबा सुटल्याने ती थेट विद्युत खांबावर जाऊन आदळली. या धडकेमुळे खांब कोसळून कारवर पडला आणि विद्युतभारित तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने शॉर्टसर्किट झाले. यामुळे विद्यापूर परिसरातील काही घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ मदतकार्य केले.
यावेळी प्रसंगावधान राखत चालक गाडीतून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघाताची नोंद गोकाक शहर पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.