बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावकर निर्माता असलेल्या युवा वर्गाने बनविलेला ‘ऑल इज वेल’ हा मराठी चित्रपट मनोरंजनाची अफलातून मेजवानी असणार आहे .असा विश्वास निर्माते अमोद मुचंडीकर आणि दिग्दर्शक योगेश जाधव यांनी व्यक्त केला. चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली.

मैत्री ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पड‌द्यावर दिसणार आहे. अमर, अकबर आणि अँथनी यांच्या मैत्रीची ही गोष्ट आहे. मनोरंजन आणि मस्तीचे जबरदस्त पॅकेज असलेल्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांचे आहे. बेळगावकर असलेल्या निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत. निर्मिती पर्यवेक्षक दीपक सांबरेकर, अमित जाधव आहेत. येत्या २७ जूनला ‘ऑल इज वेल’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सहकुटुंब अनुभवायला मिळणारी हास्याची मेजवानी आहे.

आनंद, राग, मनातील गुपितं व्यक्त करण्यासाठी हक्काची मैत्री असली की आयुष्य रंगतदार होतं हा आशय अधोरेखित करणाऱ्या ‘ऑल इज वेल’ चित्रपटातून प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर है जबरदस्त त्रिकुट पहिल्यांदाच एकत्र आले आहे. या तिघांसोबत चित्रपटात सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. मैत्रीसाठी काहीही करायला तयार असणान्या या तीन मित्रांच्या आयुष्यात अशा घटना घडतात की, त्यांच्या आयुष्यात खळबळ उडते. मात्र न डगमगता हे तीनही मित्र परिस्थितीला सामोरे जात एकत्र उभे ठाकतात. आपल्यातील मैत्री जपत फसवणुकीचा हे तीन मित्र कसा निकाल लावतात? याची धमाल दिग्दर्शक योगेश जाधव यांनी ‘ऑल इज वेल चित्रपटामधून दाखविली आहे.

‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. संगीत चिनार-महेश, अर्जुन जन्या यांचे आहे. पर्याकन मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. वेशभूषा कीर्ती जंगम तर रंगभूषा अतुल शिधये यांनी केली आहे. गीतकार मंदार चोळकर आहेत. गायक रोहित राऊत, गायिका अपेक्षा दांडेकर यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. तरुणाईची कथा असलेला ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट कलाकारांचा सुरेख अभिनय, सुमधूर संगीत आणि नेत्रसुखद सादरीकरणाने सजला आहे. हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला चित्रपटाचे निर्माते सहनिर्माते, छायाचित्रकार, निर्मिती पर्यवेक्षक व अन्य सदस्य उपस्थित होते.