बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिकेच्या २३ व्या कार्यकाळातील महापौरपदी मंगेश पवार यांची तर वाणी विलास जोशी यांची उपमहापौरपदी निवड झाल्याची घोषणा प्रादेशिक आयुक्त बी. एस. शेट्टण्णावर यांनी केली. शनिवारी बेळगाव महापालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये नूतन महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली.
महापौरपदासाठी मंगेश पवार, राजू भातकांडे, मारुती मोदगेकर आणि शाहिद खान पठाण या चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यापैकी राजू भातकांडे, शाहिद खान पठाण यांनी उमेदवारी मागे घेतली. मग महापौरपदासाठी मंगेश पवार आणि मारुती मोदगेकर यांच्यात झालेल्या लढतीत मंगेश पवार यांना ४० मते तर उपमहापौरपदासाठी वाणी विलास जोशी आणि लक्ष्मी लोकरे यांच्यात झालेल्या लढतीत वाणी विलास जोशी ४० मते मिळाल्याने प्रादेशिक आयुक्त बी.एस.शेट्टण्णावर यांनी महापौरपदी मंगेश पवार तर उपमहापौरपदी वाणी जोशी यांची निवड जाहीर केली.
निवडणूक निकालानंतर बोलताना माजी मुख्यमंत्री व खासदार जगदीश शेट्टर म्हणाले की, नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांनी बेळगाव शहराच्या विकासासाठी मेहनत घ्यावी. सुशासनासाठी केंद्र व राज्य सरकारचे प्रकल्प शहरातील जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. नूतन महापौर व उपमहापौर यांनी मनपातील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन बेळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कठोर परिश्रम घ्यावेत, असे मत विधानपरिषद सदस्य सायबाण्णा तलवार यांनी व्यक्त केले.
मनपातील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन बेळगाव शहराच्या विकासासाठी मेहनत घेणार असल्याचे नूतन महापौर मंगेश पवार यांनी सांगितले. यावेळी महापालिका आयुक्त शुभा बी.यांच्यासह सत्ताधारी व विरोधी गटाचे नगरसेवक – नगरसेविका, खासदार जगदीश शेट्टर, आमदार अभय पाटील आदी उपस्थित होते.