- शहर पोलीस आयुक्तालय व जिल्हा पोलीस विभागातर्फे आयोजन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव पोलिस आयुक्तालय आणि जिल्हा पोलिस दलाच्यावतीने बुधवारी जिल्हा पोलिस मुख्यालयातील पोलिस परेड मैदानावर कर्नाटक राज्य पोलीस ध्वज दिन साजरा करण्यात आला. बेळगाव उत्तरचे पोलीस महानिरीक्षक डॉ.चेतनसिंग राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला निवृत्त पीएसआय गंगाधर हेगडे, सेवानिवृत्त सी.एच.सी.गलेप्पा हादगीन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रारंभी बेळगाव शहर राखीव पोलिस, जिल्हा पोलिस, केएसआरपी आदी पोलिस पथकांनी शानदार पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. शहर पोलिस आयुक्त इडा मार्टिन यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना सेवानिवृत्त पीएसआय गंगाधर हेगडे यांनी पोलीस ध्वज दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच पोलीस ध्वज विक्रीतून जमा होणारा निधी निवृत्त व सेवारत पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासह इतर सेवांसाठी वापरला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तर उत्तरचे पोलीस महानिरीक्षक डॉ. चेतनसिंग राठोड यांनी पोलीस विभागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पोलीस ध्वज दिनाबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी कायदा – सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी सदैव सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि विभागात सेवा बजावून निवृत्त झालेल्या जवानांचे स्मरण व्हावे यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. पोलीस ध्वजांच्या विक्रीतून जमा होणारा निधी सेवानिवृत्त आणि सेवारत कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासह इतर कामांसाठी वापरला जातो, असे सांगितले.

यावेळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे व वाहतूक विभाग पोलिस उपायुक्त यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.