• जिल्ह्यात पहिला बळी

बेळगाव / प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून बेळगावसह राज्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत चालली आहे. अशातच कोरोनाची लागण झाल्याचे निदान झालेल्या एका ७० वर्षीय वृद्धाचा उपचाराचा उपयोग न होता मृत्यू झाला आहे. या पद्धतीने यावेळच्या कोरोना संसर्गामुळे बेळगाव जिल्ह्यात पहिला बळी गेला आहे. त्यामुळे सर्वत्र धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिम्स हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन पावलेला ७० वर्षीय वृद्ध रुग्ण हा बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावचा रहिवासी होता. त्याला काल बुधवारीच उपचारासाठी बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रारंभी सदर वृद्ध घरात पडल्यामुळे त्याच्यावर उपचार केले जात होते. मात्र त्यावेळी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्याच्यावर तातडीने आवश्यक उपचार सुरू होते. तथापि उपचाराचा फायदा न होता त्याचा मृत्यू झाला.