बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात बुधवार दि. १६ एप्रिल रोजी शांततापूर्ण आणि सुव्यवस्थितपणे सीईटी परीक्षा पार पडली. परीक्षेकरिता विद्यार्थ्यांसाठी २१ परीक्षा केंद्रांची व्यवस्था केली गेली होती. ज्यामध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी आपले भाग्य आजमावले.
बुधवारी सकाळी फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन विषयांची परीक्षा घेण्यात आली. सकाळच्या फिजिक्स परीक्षेला ७४३६ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. दुपारी २ वाजता झालेल्या केमिस्ट्री परीक्षेला ७४३० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
परीक्षेच्या आयोजनासाठी सर्व आवश्यक तयारी आणि व्यवस्थापन पुरेसे करण्यात आले होते. परीक्षा शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी पोलिस विभागाने कडक बंदोबस्त ठेवला होता. तर शिक्षण विभागासह इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी परीक्षेच्या योग्य आयोजनासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही परीक्षा केंद्रांवर उपस्थिती दर्शविली.