-
वीजांचा कडकडाट अन् गारपिठीसह यंदाच्या वर्षातील पहिला शिडकावा
-
उष्म्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना दिलासा
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यासह शहरात आज मंगळवारी यंदाच्या हंगामातील पहिल्याच वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र गारपीठ आणि विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. गेले काही दिवस बेळगावचा पारा चांगलाच वाढला आहे. गेल्या दोन – तीन दिवसात तर अंगाची काहिली होत होती. यामुळे अवकाळी पाऊस व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा होती. दरम्यान मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने आज वळीव पाऊस बरसणार या आशेने नागरिक प्रतिक्षा करत होते. त्यानंतर दुपारी ३.१५ च्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आणि सायंकाळी ५.३० वा. गारपिठीसह विजांच्या गडगडाटात पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला.
बेळगाव तालुक्याचा पश्चिम भाग आणि शहराच्या मध्यवर्ती भागासह भाग्यनगर, वडगाव, जुने बेळगाव, अनगोळ परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आणि जानेवारी महिन्यापासूनच उष्मांकात झालेली वाढ आज काहीशी कमी झाली.
एकंदरीत गेले काही दिवस वळीव पाऊस होईल अशी शक्यता होती, मात्र प्रत्यक्षात पाऊस बरसला नव्हता. मात्र आज अपेक्षेप्रमाणे झालेल्या वळीव पावसामुळे उन्हाळ्यात पावसाळी वातावरणाचा आहाल्लादायक अनुभव आला.