बेळगाव / प्रतिनिधी
आज देशभरात मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने बेळगावमध्येही सोमवारी सकाळी बेळगावातील अंजुमन-ए-इस्लामच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण कार्यक्रम पार पडला. काल चंद्रदर्शन झाल्यानंतर आज बेळगावमध्ये रमजान ईदचा उत्साह दिसून आला.
यावेळी नयीम खतीब यांनी खुतबा आणि हाफीज अब्दुल रजाक यांनी नमाज पठण केले. यावेळी मौलाना मुफ्ती अब्दुल अझीझ, मंजूर नोमानी आणि मुफ्ती झो यांसारख्या धर्मगुरूंनी सहभागी होत , जगभर सुख, शांती आणि समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना केली.
याप्रसंगी आमदार आसिफ सेठ, माजी आमदार फिरोज सेठ, फैजान सेठ, नगरसेवक मुजम्मिल ढोणी, तसेच डीसीपी रोहन जगदीश यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार आसिफ सेठ आणि माजी आमदार फिरोज सेठ यांनी उपस्थितांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत, संपूर्ण जगाला सुख, शांती आणि समृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सामूहिक नमाज अदा करत परस्पर शुभेच्छांची देवाणघेवाण केली.
एकंदरीत संपूर्ण महिनाभर रोजा पाळल्यानंतर सॊमवारी मुस्लीम बांधवांनी आज रमजान ईद सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला.