बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहर आणि परिसराला मंगळवारी दुपारी पावसाने चांगलेच झोडपून काढले. तुफान पावसामुळे शहराच्या विविध भागात पाणी साचल्याने बहुतांश भाग जलमय बनले होते. मागील आठवड्याभरापासून मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे आता लवकरच मान्सूनचे आगमन होणार असल्याची चाहूल शहराला लागली आहे. मंगळवारी सकाळपासूनच पावसाळी हवामान दिसून येत होते. दुपारी तीनच्या सुमारास पावसाच्या वर्षावाला सुरुवात झाली. तालुक्याच्या अनेक गावांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. पावसाच्या वर्षावामुळे शहर आणि तालुका परिसरात उष्म्याचे प्रमाण घटले आहे.