-
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा
मुंबई : आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघाचा कर्णधार म्हणून शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्याआधी कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रोहितनंतर भारतीय संघाचा कर्णधार कोण असणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात होता. अखेर आता या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे.
बीसीसीआय निवड समितीची मुंबईतील मुख्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर निवड समिती अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली. आगरकर यांनी शुबमन गिल याचे कर्णधार म्हणून नाव जाहीर केले. सोबतच इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणाही केली. इंग्लंड दौऱ्यासाठी १८ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यष्टीरक्षक ऋषभ पंत याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर या दोघांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला खेळावे लागणार आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याला कसोटी क्रिकेट संघात तरुण नेतृत्व आणि नव्या दमाचे खेळाडू हवे होते. त्यामुळे गौतम गंभीर हा रोहित शर्मा आणि विराट कोहलीला भारतीय संघात खेळवण्यासाठी उत्सुक नव्हता. विराट कोहलीला संघात स्थान मिळाले असते तरी त्याच्याकडे कर्णधारपद नसते. यामुळेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
-
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार) , ऋषभ पंत (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल , करुण नायर , रवींद्र जाडेजा , वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप , कुलदीप यादव, के. एल. राहुल , साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल