बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्ह्यातील बसवन कुडची येथे यात्रेनिमित्त आयोजित आंबिलगाड्या शर्यतीत घडलेल्या दुर्घटनेत गाडीच्या चाकाखाली सापडून युवक गंभीर जखमी झाला होता. जखमी युवकावर उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
बेळगाव जिल्ह्यातील बसवन कुडची येथे यात्रेच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात आंबिलगाड्यांची शर्यत पार पडते. दरम्यान, यात्रेच्या जल्लोषात सहभागी असलेल्या पारीश पाटील (वय २७) या युवकावर मात्र काळाने घाला घातला. स्पर्धेदरम्यान वेगाने धावत असलेल्या आंबीलगाड्यांपैकी एका गाडीच्या चाकाखाली तो सापडला. या दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला. गंभीर अवस्थेत असलेल्या युवकाला तातडीने बेळगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांसह गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद माळमारुती पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.