• श्रीपंत गुरुचरित्र पारायण बोधपीठास उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव / प्रतिनिधी

श्री दत्त संस्थान पंतबाळेकुंद्रीच्यावतीने दि. १० ते १३ मे दरम्यान आयोजित श्रीपंत गुरुचरित्र पोथीचे सामुदायिक वाचन व श्रीपंत बोधपीठ वासंती शिबिर भाविक भक्तांच्या अपूर्व उत्साहात पार पडले. दरम्यान मंगळवार दि. १३ रोजी श्रीपंत महाराजांचा परममंगल विवाह सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.शिबिरात सहभागी सर्व शिबिरार्थीनी नामस्मरण, भजन, पालखी सेवा, बालगोपाळांचा विशेष कार्यक्रम तसेच महिला वर्गासाठी झालेल्या विशेष रंगतदार कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. तसेच प्राप्तस्मरण,आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

दरम्यान, मंगळवार दि. १३ रोजी सौ. यमुनाक्का माऊली व श्रीपंत महाराज यांचा परममंगल विवाह सोहळा अपूर्व उत्साहात पार पडला. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्यात विवाह विधी व इतर धार्मिक कार्यक्रमांसह, मंगलाष्टके झाल्यावर विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईसह भव्य शामियाना उभारण्यात आला होता.

श्री दत्त संस्थानचे प्रमुख ट्रस्टी रंजन पंतबाळेकुंद्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात धार्मिक व इतर कार्यक्रमांची रेलचेल झाली होती. सोहळ्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सोहळ्यानंतर आयोजित महाप्रसादाचा शेकडो भक्तांनी लाभ घेतला. या तीन दिवसीय कार्यक्रमात पालखी सोहळा पार पडला. या सोहळ्यात विविध भागातून आलेल्या पुरुष व महिलांनी सहभाग घेतला. यावेळी बालगोपाळांच्या कला व बौद्धिक गुणांना वाव देणाऱ्या विशेष कार्यक्रमात बालगोपाळांनी आपल्या कलेची व बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिली. महिलांच्या विशेष कार्यक्रमात महिला वर्गाचा उत्साह ओसंडून वाहणारा ठरला. तसेच भजनादी कार्यक्रम व लेझीम पथकाचे सादरीकरण उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमास बेळगाव शहर परिसरासह कर्नाटक राज्याच्या विविध भागातून व महाराष्ट्रातून पंत भाविक भक्तांची उपस्थिती लक्षणीय होती.