बेळगाव / प्रतिनिधी
मुस्लीम बांधवांचा बकरी ईद सण शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी सर्वधर्मियांनी सहकार्य करावे. एखादी संशयास्पद घटना घडत असल्याचे लक्षात येताच त्याची माहिती पोलिसांना द्यावी, कोणीही नैतिक पोलीसगिरी करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी शांतता समिती बैठकीत दिला. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस आयुक्तालयात सर्वधर्मियांची शांतता समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, गुन्हे व तपास विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजनराजे अरस उपस्थित होते. मुस्लीम बांधवांचा बकरी ईद सण शनिवार दि. ७ रोजी असल्याने इतर धर्मियांप्रमाणे हा सणदेखील उत्साहात आणि शांततेत पार पडावा यासाठी सर्वानी सहकार्य करणे गरजेचे आहे. कायदा व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पोलीस खात्याकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पोलीस खात्याला नागरिकांनीही सहकार्य केले पाहिजे.

एखादी घटना घडल्यास कोणीही नैतिक पोलीसगिरी करण्याचा प्रयत्न करू नये. संबंधित घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना किंवा ११२ या क्रमांकावर द्यावी. पोलीस तातडीने त्याची दखल घेऊन कारवाई करतील. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत असे कृत्य कोणीही करू नये. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. समस्या असल्यास त्या याठिकाणी मांडाव्यात. त्याचबरोबर येत्याकाळात आपण स्वतः तुमच्यापर्यंत येऊन समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित शांतता समितीच्या सदस्यांनीही आपले विचार व्यक्त केले. सदर बैठकीला खडेबाजारचे साहाय्यक पोलीस आयुक्त एच. शेखराप्पा, मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक महांतेश धामणावर यांच्यासह माजी महापौर मालोजी अष्टेकर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील यांच्यासह मुस्लीम समाजातील शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.