- पावणे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त : एपीएमसी पोलिसांची कारवाई
बेळगाव / प्रतिनिधी
आझमनगर येथील फ्लॅटमध्ये घडलेल्या चोरीच्या घटनेचा खडा लावण्यात एपीएमसी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सोमवार दि. २८ रोजी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तौसिकअहमद मुकुतमसाब सिंपी (वय ३० रा. फ्लॅट नं. ५, मून लाईट अपार्टमेंट, आझमनगर आठवा क्रॉस, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सात ७ लाख ७८ हजार ६७३ रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
एपीएमसी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील आझमनगर येथील अपार्टमेंटमध्ये दि. २३ एप्रिल रोजी फ्लॅटमध्ये चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी इम्रान अब्दुल सत्तार चांदवले यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. चोरट्याने त्यांच्या फ्लॅट मधील सोन्या-चांदीचे दागिने चोरले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेत वरील संशयताला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक उस्मान ओटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.