बेळगाव / प्रतिनिधी

बेळगावमध्ये पुढील तीन महिन्यांत ऑटो मीटर सक्तीचे केले जाईल, अशी घोषणा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली आहे. गुरुवारी पत्रकार संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, ऑटो मीटर सक्तीचे करण्यासाठी त्यांनी आणि प्रादेशिक परिवहन आयुक्तांनी अनेकदा बैठका घेतल्या असून, ऑटो चालक संघटनांशी चर्चा केली आहे. शहरातील एकूण १५,००० ऑटोना परवानगी देण्यात आली आहे. आता त्यांची संख्या नियंत्रित करणे गरजेचे आहे. त्यामुळे, आता नवीन ऑटोना परवानगी दिली जाणार नाही.

मीटर केवळ मान्यताप्राप्त वितरकांकडूनच खरेदी करण्याची परवानगी असेल आणि मीटर दुरुस्तीची व्यवस्थाही केली जाईल. यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ऑटो चालक आणि प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये, अशा प्रकारे ही योजना लागू केली जाईल. ऑटो चालकांनी याला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

सध्या जिल्ह्यात ओला, उबर आणि रॅपिडो या अॅप-आधारित टॅक्सी सेवांची मागणी नाही, असेही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नमूद केले.