- रोख रक्कम ,चांदीचे दागिने आणि कृषीपंप लंपास
- लावणी सम्राट बालाजी चिकले यांचे घर फोडले
बेळगाव / प्रतिनिधी
अतिवाड फाट्यावरील एका बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या घटनेत दहा तोळे चांदीचे दागिने, रोकड आणि कृषीपंप असा मोठा ऐवज चोरीला गेला आहे. पोलिसांकडून तपास सुरू असला तरी तालुक्यात चोऱ्यांच्या घटनांनी चिंता वाढवली आहे.
बेळगाव – कोवाड मुख्य मार्गावरील अतिवाड फाट्यावर काल बुधवार (दि. ९) एप्रिल रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडले. हे घर लावणी सम्राट बालाजी चिकले यांच्या मालकीचे असून ते मुंबईत वास्तव्यास असल्याने सध्या बंद आहे. हीच संधी साधून चोरट्यांनी दोन्ही दरवाज्यांचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील पाच हजार रुपयांची रोख रक्कम, दहा तोळे चांदीचे दागिने, तसेच घराशेजारी ठेवलेला ३० हजार रुपयांचा कृषीपंप लंपास केला. घटनेची माहिती मिळताच काकती पोलीस स्थानकातील कर्मचारी गुरुवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली. मात्र या चोऱ्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.