• बुडा कार्यालयानजीक असदखान सोसायटी येथील घटना
  • दिवसाढवळ्या दरोड्याच्या प्रयत्नामुळे खळबळ 

बेळगाव / प्रतिनिधी

सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने फिल्मी स्टाईलने घरात प्रवेश करून एका रिअल इस्टेट व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र आरडाओरडा होताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. शहरातील बुडा कार्यालयाजवळील असद खान सोसायटी येथे आज दुपारी १. ३० वा. सुमारास ही खळबळजनक घटना घडली. दिवसाढवळ्या घडलेला दरोड्याचा प्रयत्न हा परिसरात एक चर्चेचा विषय झाला आहे. मैनुद्दीन पठाण असे त्या रिअल इस्टेट व्यावसायिकाचे नाव असून ते बुडा कार्यालयानजीकच्या असदखान सोसायटीमध्ये आपल्या पत्नी व मुली समवेत राहतात.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, पाच सशस्त्र दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईलने बंदुकीचा धाक दाखवत आज शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पठाण यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मैनुद्दीन यांची पत्नी व मुलीवर बंदूक ताणून त्यांच्याकडे घरातील पैसे आणि दागदागिन्यांची मागणी केली. प्रारंभी घाबरलेल्या पठाण कुटुंबीयांनी नंतर धीर एकवटून दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा घरातील पैसे आणि किमती ऐवज झटपट लुटण्याच्या उद्देशाने दरोडेखोरांनी मैनुद्दीन यांना घरातील शौचालयात तर त्यांच्या पत्नी व मुलीला स्नानगृहात कोंडून घातले.

त्यावेळी प्रसंगावधान राखून मैनुद्दीन पठाण यांनी शौचालयाच्या खिडकीच्या काचा फोडून मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांच्या ओरडण्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

सदर घटनेची माहिती मिळताच मार्केट आणि माळमारुती पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पठाण यांच्या घरी दाखल होऊन पाहणी केली. यावेळी ठसे तज्ञ आणि पोलीस श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून दरोडेखोरांना शोधण्यासाठी एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तपास सुरू आहे. तथापि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पठाण यांच्या घरात दरोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोरांना लवकरात लवकर गजाआड केले जाईल, असे आश्वासन दिले आहे.