बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमधील अरिहंत हॉस्पिटलने लॅपरोस्कोपिक प्रक्रियेद्वारे किडनी प्रत्यारोपणाने एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. सांगली येथील ४७ वर्षीय बहिणीने तिची किडनी तिच्या बेळगाव येथील ४५ वर्षांच्या धाकट्या बहिणीला दान करून नवजीवनाची भेट दिली. सदर महिला रुग्ण गेल्या दोन वर्षांपासून डायलिसिसवर होती. सतत डायलिसिस सुरू असूनही रुग्णाची तब्येत वारंवार बिघडली होती. ज्यामुळे किडनी प्रत्यारोपण याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
दरम्यान याबाबत रुग्ण व नातवाईकांनी अरिहंत हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. यानंतर डॉ. विजयकुमार पाटील यांची भेट घेऊन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान डॉक्टरांनी प्रगत लॅपरोस्कोपिक नेफ्रोक्टॉमी तंत्राचा वापर करून किडनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेनंतर दात्याला तर केवळ तीन दिवसांनी तर रुग्णाला केवळ आठ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला. प्रत्यारोपणानंतर रुग्णाच्या क्रियाटिन पातळीत तीव्र घट झाली आहे. जी १२ एमजीडीएलवरून ०.६ एमजीडीएलवर आली असून प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.
डॉ. विजयकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अमित मुंगरवाडी, डॉ. शिवंगोंडा, डॉ. भुवनेश, डॉ. अविनाश, डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. अविनाश, डॉ. अनुषा यांच्या पथकाने यशस्वी शस्त्रक्रिया केली. याबाबत डॉ. एम. डी. दीक्षित, संचालक अभिनंदन पाटील, उत्तम पाटील यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले.