बेळगाव : येथील सर्वात जुन्या असलेल्या दि पायोनियर अर्बन बँकेच्या व्यवस्थापन मंडळावर चेअरमनपदी अनंत लाड यांची निवड करण्यात आली आहे. रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक धोरणानुसार 100 कोटी हून अधिक ठेवी असलेल्या सहकारी बँकांना व्यवस्थापन मंडळ म्हणजेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंट स्थापन करणे बंधनकारक आहे. त्याला अनुसरून पायोनियर बँकेचे चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर यांनी व्यवस्थापन मंडळाची नावे रिझर्व बँकेला कळवली होती. त्याला मंजुरी मिळाली असून त्यानुसार व्यवस्थापन मंडळाच्या चेअरमनपदी अनंत लाड, सदस्य पदी संचालक गजानन पाटील, बँकिंग तज्ञ म्हणून चार्टर्ड अकाउंटंट नितीन हिरेमठ, कायदेतज्ञ म्हणून एडवोकेट कमलेश मायानाचे व अभियंता ज्ञानेश्वर सायनेकर यांची निवड झाली आहे.
दि. 28 एप्रिल रोजी झालेल्या बँक संचालक मंडळाच्या बैठकीत प्रदीप अष्टेकर यांनी रिझर्व बँकेकडून परवानगी आली असल्याची माहिती दिली. प्रारंभी बँकेच्या सीईओ अनिता मूल्या यांनी उपस्थित व्यवस्थापन मंडळाचे स्वागत करून प्रास्ताविक केले. पायोनियर बँकेला 118 वर्षाची गौरवशाली परंपरा असून गेल्या काही वर्षात प्रदीप अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली बँकेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. रिझर्व बँकेने घालून दिलेल्या नियमांच्या अनुसार कार्यरत राहिलेल्या या बँकेने सभासदांच्या हिताचा नेहमी विचार केला आहे.
व्यवस्थापन मंडळाच्या नूतन चेअरमनपदी फेरनिवड झाल्याबद्दल अनंत लाड यांनी संचालक मंडळाचे आभार मानले. मागील वर्षीही आपण व्यवस्थापन मंडळाचे चेअरमन म्हणून व्यवस्थित धुरा सांभाळलेली आहे. याही पुढे बँकेची वाटचाल व्यवस्थितरीत्या होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली .याप्रसंगी बँकेच्या व्हाईस चेअरमन सुवर्णा शहापूरकर आणि इतर संचालक उपस्थित होते.