• विकास प्रकल्पासाठी केले मूल्यांकन

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील जुन्या पी. बी. रोडवरील पूर्वीच्या जुन्या भाजी मार्केटच्या पडीक जागेच्या ठिकाणी एखादा विकास प्रकल्प राबवून तिचा सदुपयोग करण्याच्या दृष्टीने आमदार आसिफ (राजू) सेठ आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ राजीव कुमार यांनी आज सदर जागेची पाहणी करून मूल्यांकन केले.

जुन्या पी. बी. रोडवरील किल्ल्याजवळील पूर्वीच्या जुन्या भाजी मार्केटची जागा ही कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारित येते. या ठिकाणचे बेळगावचे पूर्वीचे होलसेल भाजी मार्केट एपीएमसी मार्केट यार्ड येथे स्थलांतरित करण्यात आल्यानंतर गेल्या बऱ्याच वर्षापासून सदर जागा मोकळी पडून होती. या काळात तिचा वापर अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी केला जात होता. तथापि या विस्तीर्ण जागेचा सदुपयोग करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी विकास प्रकल्प राबवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या अनुषंगाने बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राजीव कुमार यांनी आज गुरुवारी या जुन्या भाजी मार्केटच्या जागेचे विकास प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून मूल्यांकन केले. सदर नियोजित विकास प्रकल्पामध्ये गर्दी कमी करण्यासाठी पार्किंग क्षेत्र आणि पर्यावरण सुधारण्यासाठी व मनोरंजन प्रदान करण्यासाठी सार्वजनिक उद्यानाचा समावेश आहे. आजच्या पाहणी प्रसंगी आमदार सेठ आणि सीईओ राजीव कुमार यांनी कमी वापरात असलेल्या या जागेचे कार्यात्मक सामुदायिक जागेत रूपांतर करण्याच्या उद्देशाने व्यवहार्यता आणि अंमलबजावणीवर चर्चा केली. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे संबंधित अन्य अधिकारी उपस्थित होते.