- रायबाग तालुक्याच्या मेकळी गावातील घटना
बेळगाव / प्रतिनिधी
एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका स्वामीजींना अटक केली आहे. बेळगाव जिल्ह्याच्या रायबाग तालुक्यातील मेकळी गावातील राम मंदिर मठाच्या लोकेश्वर स्वामींचे दुष्कृत्य उघड झाले असून मुदलगी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वासनांध स्वामीजींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी या घटनेबाबत माहिती दिली. यावेळी ते पुढे म्हणाले, स्वामीजींनी मठात येणाऱ्या एका भक्ताच्या मुलीला बागलकोटमार्गे रायचूरला नेले आणि तेथीलच एका लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तिला महालिंगपूर बस स्थानकावर सोडले. तसेच या प्रकाराबाबत घरी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र पीडित मुलीने तिच्या कुटुंबाला ही माहिती दिली. दरम्यान अत्याचार केल्याचे उघडकीस आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी मुडलगी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी स्वामीजींच्या विरोधात गुन्हा दाखल करून रायबाग तालुक्याच्या मेकळी गावातील त्यांच्या राम मंदिर मठाला भेट दिली. तेव्हा मठात घातक शस्त्रे सापडली. सध्या पोलिसांनी आरोपी स्वामीजींना ताब्यात घेतले आहे आणि प्रकरणाचा तपास करत आहेत.