• टेकऑफ करताच आग लागल्याने दुर्घटना
  • तब्बल २४२ प्रवाशांना घेऊन लंडनसाठी केले होते उड्डाण

गुजरात : अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली असून तब्बल २४२ प्रवाशांना घेऊन जाणारे प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळले आहे. एअर इंडियाच्या या विमानाने अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते. मात्र, दुपारी १.३८ वा. उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान खाली कोसळले. या दुर्घटनेनंतर काही वेळातच तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सध्या, एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली, तसेच सर्वोतोपरी मदतीचे आश्वासनही दिले.

गुजरातमधील अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला असून ७०० फुटांवरुन मेघानीनगर ह्या नागरी वस्तीत हे विमान कोसळले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विमानातून १० क्रू मेंबरसह तब्बल २४२ प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले असून, जिथे प्लेन क्रॅश झाले. त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचे व्हिडिओतून दिसून येत आहे. घटनास्थळी विविध बचाव पथक दाखल झाले आहेत. मात्र, या दुर्घटनेत मोठी जिवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अहमदाबादहून लंडनला म्हणजेच दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानात इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आले होते. त्यामुळे अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला.