• प्रशिक्षण प्राप्त १६३४ वायु अग्निवीरांचा दीक्षांत संचलन सोहळा दिमाखात

बेळगाव / प्रतिनिधी

बावीस आठवड्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या १६३४ अग्निवीर वायू पुरुष आणि महिला प्रशिक्षणार्थी जवानांचा दीक्षांत समारंभ शुक्रवारी बेळगावच्या एअरमेन ट्रेनिंग स्कूलमध्ये पार पडला.

प्रारंभी प्रशिक्षणार्थी जवानांनी शानदार व प्रभावी पथसंचलन केले. यावेळी एअर व्हॉ. मार्शल पीसीपी आनंद, एअर ऑफिसर कमांडिंग ॲडव्हान्स हेडक्वॉर्टर्स भारतीय वायुसेनेचे दक्षिण-पश्चिम एअर कमांडर हे पासिंग आऊट परेडचे पुनरावलोकन अधिकारी होते. त्यांनी प्रशिक्षणार्थींच्या संचलन आणि उत्साही कामगिरीचे कौतुक करून उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले. तसेच विविध श्रेणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गुणवंत प्रशिक्षणार्थींना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार केला. अग्निवीर प्रशिक्षणार्थी श्वेता यांना सर्वोत्कृष्ट शैक्षणिकसाठी, क्रिश परगई यांना सर्वोत्कृष्ट ग्राउंड सर्विस ट्रेनिंगसाठी (GST), आशिष कुमार यांना बेस्ट मार्क्समनसाठी, प्रवीण कुमार यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलूसाठी ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.

यावेळी प्रशिक्षणार्थी जवानांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, सातत्याने बदलत असलेल्या जागतिक सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींनी नेहमी सतर्क राहुल कर्तव्यांशी वचनबद्ध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तरुण योद्ध्यांना सतत शिकण्यास नवी आव्हाने स्वीकारण्यास आणि बदलत्या जागतिक सुरक्षा वातावरणात कर्तव्यासाठी तयार राहण्यास प्रोत्साहित करून त्यांनी अनुकूलतेचे महत्व पटवून देण्यावर भर दिला. तसेच कर्तव्यावर असताना किंवा नसतानाही आपल्या वचनांशी कटिबद्ध राहण्याचे आवाहन त्यांनी जवानांना केले. पुनरावलोकन अधिकाऱ्यांनी पालकांच्या अढळ पाठिंबाबद्दल मनापासून आभार मानले. तसेच भावी पिढीला वायुसेनेत भरती होण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. याशिवाय युवा अग्निवीरांना कुशल आणि प्रभावी प्रशिक्षण देऊन सन्मान, धैर्य आणि वचनबद्धतेने राष्ट्रसेवेसाठी सज्ज करणाऱ्या एअर ऑफिसर कमांडिंग आणि एअरमेन ट्रेनिंग स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले.

सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींच्या कुटुंबीयांसाठी हा कार्यक्रम अभिमानाचा आणि भावनेचा क्षण होता.