• तालुका म. ए. समिती बैठकीत निर्णय
  • १ जून रोजी हिंडलगा येथे हुतात्मा दिन

बेळगाव / प्रतिनिधी

सीमाभागातील मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढा दिल्याशिवाय पर्याय नाही. कन्नडसक्ती दूर व्हावी यासाठी ९ जणांनी हौतात्म्य पत्करले. पण, कन्नडसक्ती काही कमी झाली नाही. त्यामुळे आता एकजुटीने पुन्हा लढ्याची गरज आहे. १ जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन करून पुढील लढ्याची दिशा ठरवण्याचा निर्णय तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती बैठकीत घेण्यात आला. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवारी (दि. २७) मराठा मंदिरमध्ये झाली. समिती अध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणेकर अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, १९८६ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कन्नडसक्तीविरोधी आंदोलन सुरु करण्यात आले. त्यांना अटक झाल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलने सुरु झाली. त्यामध्ये सीमाभागातून ९ हुतात्मे झाले. हे हुतात्मे झाले, अटक झाली तरी कन्नडसक्ती दूर झालेली नाही. आज लढा सर्वोच्च न्यायालयात आहे. तिथे निकाल लागेपर्यंत पाठपुरावा करावा लागणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार कसे सक्रिय होईल, याकडे बघावे लागणार आहे. तज्ज्ञ समिती, उच्चाधिकार समिती बैठक, पुनर्रचना करावी लागणार आहे. त्यामुळे १ जून रोजी हिंडलगा येथे अभिवादन करुन पुढील लढ्याची दिशा ठरवूया, असे त्यांनी सांगितले.

आर. एम. चौगुले म्हणाले, आपल्या लढ्यात युवकांची संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. लढा पुढे नेण्यासाठी मध्यवर्ती समितीत निर्णय घ्यावा, असे सांगून हुतात्मा दिनाचा कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा पंचायत माजी सदस्य रामचंद्र मोदगेकर, बी. डी. मोदगेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील यांनी हिंडलगा येथील हुतात्मा भवनाबाबत सुरु असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. सरकारी कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले.

या बैठकीला मल्लाप्पा गुरव, अनिल पाटील, मोनाप्पा पाटील, बी. एस. पाटील, लक्ष्मण होनगेकर, शंकर कोणेरी, नारायण सांगावकर, महादेव बिर्जे, अॅड. प्रसाद सडेकर, अंकुश पाटील, कमल मन्नोळकर, एम. आर. पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • मंत्र्यांची साथ नाही 

सीमाभागासाठी महाराष्ट्र सरकारने सीमा समन्वय मंत्री नेमले आहेत. पण, त्यांनी अद्याप महाराष्ट्र एकीकरण समितीशी संपर्क साधलेला नाही. त्यांची साथ लाभत नाही. त्यामुळे, सीमालढ्याला मरगळ आली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.