- गोकाक तालुक्यातील घटना
गोकाक / वार्ताहर
आंघोळीला गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला. कोन्नूर (ता.गोकाक ; जि.बेळगाव) येथे रविवार दि. ११ रोजी ही घटना घडली. मनोहर कुमार तळवार (वय १५ रा.कोन्नूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, कोन्नूर येथील मनोहर कुमार तळवार हा काल, रविवारी नेहमीप्रमाणे शाळेला सुट्टी असल्याने घटप्रभा नदीवर आंघोळीसाठी गेला होता. बराच वेळ झाला तरी मुलगा घरी न परतल्याने पालकांनी त्यांच्या मुलाचा शोध घेतला आणि नदीकाठी आल्यावर त्यांना धक्का बसला आणि त्यांनी आजूबाजूला शोध घेतला.
नंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बोटी वापरून शोध मोहीम राबवली. मात्र, तो सापडला नाही. आज त्यांनी दुसरी मोहीम हाती घेतल्याचे सांगण्यात येत असून स्थानिकांनी मुलगा पाण्याच्या जलद प्रवाहाने वाहून गेला असावा, असा संशय व्यक्त केला आहे.