• पोलीस अधिकाऱ्यावर उगारला हात : भाजपकडून निषेध

बेळगाव / प्रतिनिधी

मेळाव्यामध्ये गोंधळ घालणाऱ्या महिलांना पोलिसांनी सभा मंडपाच्या बाहेर नेले. तरी देखील गोंधळ सुरूच असल्याने मुख्यमंत्र्यांना संताप अनावर झाला. सभा मंडपा समोर उभे असलेले यापूर्वीचे बेळगावचे मार्केट एसीपी व सध्याचे धारवाड येथील अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख नारायण बरमणी यांना व्यासपीठावर बोलावून घेतले. भाजप कार्यकर्त्या आंदोलन करत असताना पोलीस कुठे होते? असा प्रश्न विचारत त्यांच्यावर हात उगारला.

भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत गोंधळ घातल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या संतापले. या संतापाच्या भरात त्यांनी पोलिसांना लक्ष्य केले.

इतकी मोठी यंत्रणा असतानाही भाजप कार्यकर्ते आत आलेच कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मेळाव्यासाठी आलेले धारवाडचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख नारायण बरमणी यांना व्यासपीठावर बोलावले. तुमचे एसपी कोण? असे विचारत त्यांनी हात उगारला. त्या ठिकाणी असलेल्या मंत्री एम. बी. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना तात्काळ आवरले. या घटनेमुळे सोमवारी दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात येत होता. समाज माध्यमांवर याच व्हिडिओची सर्वत्र चर्चा होती. भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू होता.